अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.०० वाजता कन्नड येथून चाळीसगावकडे येणारी छोटी आयशर (क्रमांक UP 14 HT 5605) ही मेणबत्ती पॉईंटच्या थोड्याच पुढे घाटात नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. या अपघातात आयशरचा चालक निरंकार देवेंद्र चव्हाण (वय २७, रा. विजयनगर, मदनगर, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) हा वाहनासह दरीत अडकून पडला.
अपघाताची माहिती मिळताच ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये मोटारसायकल चालक अविनाश वाघ (रा. नांदगाव) यांनीही महत्त्वाची मदत केली. तसेच महामार्ग पोलीस केंद्राचे पीएसआय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू पाटील, सचिन अडावदकर, जितेंद्र माळी, रवींद्र वाघ, पोलीस नाईक अमोल पाटील व पोलीस शिपाई दीपक जगताप यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मोठ्या शर्थीने बचावकार्य राबवले.
खूप कसरतीनंतर चालक निरंकार चव्हाण यास दरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात त्याच्या तोंडावर व शरीराच्या इतर भागांवर किरकोळ दुखापत झाली. महामार्ग पोलिसांनी तत्काळ शासकीय वाहनाने त्यास चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. घाट परिसरात वाहनचालकांनी विशेष काळजी घेऊन वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
