अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी) – मेहुणबारे पोलीस स्टेशनने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड येथे दिवसा दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गु.क्र. ०७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी तपास पथक गठित करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान दादू संजय सोनवणे (वय १९, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
यानंतर पुढील तपासात सुलतान सलीम शहा (वय ३२, रा. दहिवेल, ता. साक्री, जि. धुळे) यास ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. चौकशीत त्याने चोरीची मोटारसायकल औंदाणे येथे विकल्याची कबुली दिली. त्यानुसार विलास दत्तू पिंपळसे (वय ३०, रा. औंदाणे, ता. सटाणा, जि. नाशिक) याला १३ फेब्रुवारी रोजी अटक करून त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या तपासात चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकली व इतर एक अशा एकूण ९० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान आरोपी दादू सोनवणे, भगवान उर्फ लंगड्या सिताराम करंगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) व सुलतान शहा यांनी संघटितपणे चाळीसगाव तालुक्यात चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२ अन्वये छोट्या संघटित गुन्ह्याचीही कारवाई करण्यात आली असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रविण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे तसेच पोलीस कर्मचारी मोहन सोनवणे, गोकुळ सोनवणे, मिलिंद कुमावत, विनोद बेलदार, राकेश काळे, प्रशांत खैरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोउनि विकास शिरोळे व मिलिंद कुमावत करीत आहेत.
