oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी): शहरातील न्यायालय परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या वकिलावरील जीवघेण्या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले असून प्लॉट व्यवहारातील वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव वकील संघाचे सदस्य ॲड. समीर शेख यांनी संबंधित आरोपींकडे प्लॉट खरेदीसाठी संपूर्ण रक्कम अदा केली होती. मात्र पैसे स्वीकारूनही आरोपींनी प्लॉट त्यांच्या नावावर करून दिला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून जाब विचारल्यामुळे आरोपीला राग असल्याचे सांगितले जात आहे.घटनेच्या दिवशी दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास संशयित आरोपी आरिफ रहमतुल्ला खाटिक, माज आरिफ खाटिक, दानिश आरिफ खाटिक तसेच सात ते आठ अनोळखी इसमांनी धारदार शस्त्रे घेऊन न्यायालय परिसरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ॲड. शेख यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
वकील संघातील इतर सदस्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून प्रसंगावधान दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला आणि ॲड. शेख यांचा जीव वाचला. जखमी अवस्थेत त्यांना बापजी जीवनदीप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून आयसीयू विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांची हालचाल; जबाब प्रलंबित
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने बापजी जीवनदीप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे धाव घेत ॲड. समीर शेख यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ॲड. शेख हे बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवता आलेला नाही. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचा अधिकृत जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
