अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी): जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत अटक केली. आरोपीकडून सुमारे ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ‘प्रिन्स वाईन शॉप’चे शटर तोडून सुमारे १ लाख ५८ हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली. त्याचप्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ‘राज वाईन शॉप’चे शटर तोडून सुमारे १ लाख ४६ हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे हाती घेतला. तपासादरम्यान रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७, रा. रामनगर, कल्याण, जि. ठाणे) यास अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीतील रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज अॅव्हेंजर मोटारसायकल जप्त करण्यात आली.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक आदी ठिकाणी त्याच्याविरुद्ध घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हापेठ पो.स्टे. कडिल गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरी. गोपाल देशमुख, व एमआयडीसी पो.स्टे. कडिल गुन्हयाचापुढील तपास पोहेकॉ. भगवान चौधरी हे करीत आहेत.
