अधिकार आमचा न्युज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी हर्षल पाटोळे
पुणे(प्रतिनिधी)-: केंद्रप्रमुखांच्या शाळांमध्ये आठवड्याला किमान पाच आदर्श व मार्गदर्शक तास घेऊन त्यांचे व्हिडिओ विनोवा अॅपवर अपलोड करण्याच्या सूचनेबाबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने आक्षेप नोंदवत जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात केंद्रप्रमुखांवर आधीच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शाळांची वार्षिक तपासणी, विविध अहवाल सादर करणे तसेच इतर प्रशासकीय कामांमुळे केंद्रप्रमुख व विषयतज्ज्ञ शिक्षकांवर मोठा ताण येत असल्याचे संघटनेने सांगितले. त्यामुळे आठवड्याला पाच आदर्श व मार्गदर्शक तास घेण्याची अट व्यवहार्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच आदर्श व मार्गदर्शक तासांचे व्हिडिओ तयार करून विनोवा अॅप किंवा यूट्यूबवर अपलोड करण्याचे निर्देश देण्याऐवजी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शिक्षकांनी अध्यापनाचे काम सोडून इतर कामांसाठी वापर होऊ नये, तसेच शिक्षकांना वाहन चालक म्हणून शाळा भेटीसाठी वापरणे टाळावे, असेही संघटनेने नमूद केले.
तालुका स्तरावर विषयतज्ज्ञ शिक्षकांना देण्यात आलेली विविध अतिरिक्त कामे कमी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष देता यावे, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे आणि महासचिव विठ्ठल सावंत यांनी दिले असून केंद्रप्रमुखांवरील वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
