Screenshot
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
पहूर (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील पहूर येथे गांजा अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व पहूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत ६३ किलो ७१० ग्रॅम गांजासह दोन कार आणि सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 44/2026 अन्वये NDPS कायदा सन 1985 चे कलम 8(क), 20(ब) व 22 प्रमाणे दि. 02 मार्च 2026 रोजी रात्री 23.42 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.उपनिरीक्षक शरद बागल (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी अहवाल दिला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दि. 02 मार्च 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना गोपनीय माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्रमांक MH-04-DJ-2042 मधून जळगावकडून पहूरकडे गांजाची वाहतूक होत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पहूर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून वाकोद गावाच्या पुढे संबंधित कार अडवली.
तपासणीदरम्यान कारमधून ६३ किलो ७१० ग्रॅम वजनाचा गांजा (प्रति किलो २०,००० रुपये प्रमाणे एकूण १२,७४,२०० रुपये किंमत) आढळून आला. याशिवाय ७ लाख रुपये किंमतीची सिल्वर रंगाची इनोव्हा (MH-04-DJ-2042) व ३ लाख रुपये किंमतीची पांढरी मारुती रिट्झ (MH-18-W-2526) अशी दोन वाहने जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी
१) सागर संजय इंगवले (रा. विचुंबे, नवी मुंबई)
२) इरफान अकरम शेख (रा. गोरेगाव, मुंबई)
३) अमन ताज खान (रा. वर्सोवा, मुंबई)
४) नईम शेख याकुब (रा. माणिकनगर, धुळे)
५) आबीद खान मेहमुद खान (रा. जाममोहल्ला, धुळे)
६) तोहसिफ खान रसूल खान (रा. १०० फुटी रोड, धुळे)
प्राथमिक चौकशीत जप्त गांजा खामगाव (अकोला) येथून खरेदी करून धुळे येथील आरोपींच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात असल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम (पाचोरा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पो.उपनिरीक्षक शरद बागल तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पहूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते (पहूर पोलीस स्टेशन) करीत आहेत.
