अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली रायगड मोहिम RMET-2026 प्रवेश परीक्षा रविवार दि. २४ मे रोजी एम.जी. नगर येथील तेली समाज मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या परीक्षेस जवळपास १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मोठा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे परीक्षा परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र, शिवकालीन इतिहास, प्रशासन व्यवस्था, युद्धनीती तसेच स्वराज्याच्या विचारसरणीवर आधारित ५० प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. रायगड मोहिमेचे हे सहावे वर्ष असून प्रवेश परीक्षेचे हे दुसरे वर्ष असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार न होता त्यांच्या विचारांचे आचरण तरुणांच्या जीवनात व्हावे, शिवइतिहासाचा अभ्यास वाढावा आणि विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने ही परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा चाळीसगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांना रायगड मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर यशस्वी ठरलेल्या पहिल्या १००० विद्यार्थ्यांना दि. ५ जून ते ७ जून दरम्यान आयोजित रायगड मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होता येणार आहे.
या मोहिमेसाठी विद्यार्थ्यांच्या तब्बल ९०० किलोमीटर प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून रायगड पायथ्याशी निवास, भोजन, आंघोळीसह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण आणि सौ. प्रतिभाताई चव्हाण हे संपूर्ण मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
परीक्षा कालावधीत सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. ही परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण अंत्योदय जनसेवा कार्यालयातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
