अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव (प्रतिनिधी): धरणगाव येथील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ७५ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २३ मार्च २०२६ रोजी कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी ३१ मार्च २०२६ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर व सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला.
या तपासादरम्यान संदीप थोरात (वय २६) व कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०, दोघेही रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली, तर विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.
आरोपींकडून ६२ हजार रुपये रोख, ८९ ग्रॅम वजनाची सुमारे ३ हजार रुपये किमतीची चांदीची लगड आणि ३.१२० ग्रॅम वजनाची सुमारे १० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ विष्णू बिहाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.
