अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या खान्देशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी, भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आषाढी वारीसाठी ही विशेष रेल्वे उपलब्ध झाली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, क्र. 09071 उधना–मिरज विशेष रेल्वे 23 व 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 6.45 वाजता सुटणार आहे. तर क्र. 09072 मिरज–उधना विशेष रेल्वे 24 व 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 8.40 वाजता उधनाकडे प्रस्थान करणार आहे. या विशेष रेल्वेच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण 4 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून, वारकरी व प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही विशेष रेल्वे उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर मार्गे मिरज अशी धावणार असून, या गाडीला एकूण 24 डबे असतील.
आषाढी वारीसाठी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील हजारो वारकऱ्यांना या विशेष रेल्वेचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे भाविकांनी वेळेत आरक्षण करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही विशेष रेल्वे सुरू झाल्याने खान्देशातील वारकरी, भाविक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.
