अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – मुलींच्या सुरक्षा विषयावर पालकांमध्ये वाढती चिंता लक्षात घेता, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आज दिनांक 27 रोजी विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी शिक्षक व सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींना घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना सभोवताली असणाऱ्या लोकांची ओळख करून घ्यावी,स्वतःची सुरक्षा कशी करावी, गुड टच-बॅड टच यांचा फरक ओळखावा आणि पालकांशी मनमोकळे संवाद साधावा या गोष्टींवर भर देत विद्यार्थ्यांशी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी संवाद साधला. याशिवाय, विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम स्पष्ट देखील स्पष्ट केले.
डॉ. देशमुख व डॉ. मुकुंद करंबेकर यांनी मुलींच्या वाढत्या वयाशी संबंधित बदल व आरोग्य विषयक सल्ला दिला. तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयाचे ट्रस्टी व सचिव डॉ. हरीश दवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळा प्रशासन व शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण सहकार्य करावे, असे आश्वासन दिले.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे 600 विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देशपांडे सर यांनी केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव वाढेल आणि ते स्वतःची काळजी घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वी देखील आनंदाबाई बंकट शाळेत तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल येथे मुटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले आहे तसेच यापुढेही चाळीसगाव शहरातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
