अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
खोपोली (जि. रायगड) –महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) यांच्यातर्फे फेलोशिप इन प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी (“Fellowship in Preventive Cardiology”) या मानाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ डॉक्टर्स डे निमित्त खोपोली येथील माधवबाग हॉस्पिटलमध्ये सोमवार, १ जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
या वेळी महाराष्ट्र, तसेच भारतातील विविध राज्यांतील डॉक्टर्सना ही मानाची पदवी विद्यापीठाचे प्रतिनिधी व सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ मा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत ॲलोपेथी,आयुर्वेद, होमिओपॅथी, योगिक सायन्स, नॅचरोपॅथी या विविध वैद्यकीय प्रणालींचा समन्वय साधणारा,अत्यंत प्रभावी व अद्वितीय अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.
हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, हा अभ्यासक्रम आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
या समारंभात चाळीसगाव (जि. जळगाव) येथील डॉ. माधवराव देवराम पंडित यांना फेलोशिप इन प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी (“Fellowship in Preventive Cardiology”) ही मानाची पदवी बहाल करण्यात आली.
डॉ. माधवराव पंडित यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की,“रुग्ण कोणत्या उपचारपद्धतीने बरा होतो, यापेक्षा तो पूर्णतः व कायमस्वरूपी बरा होणे महत्त्वाचे आहे. रुग्णांना आजार होण्याआधीच तपासणी करून संभाव्य धोके टाळणे हे आपले ध्येय असले पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या देशात अँलोपॅथी उपचार पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जाते, मात्र प्रतिबंधात्मक उपचारांबाबत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सर्व उपचार प्रणालींचा समन्वय साधत ‘होलिस्टिक’ दृष्टिकोनातून रुग्णसेवा ही काळाची गरज आहे.
एम यू एच एस नाशिक, रूबी हॉल पुणे, वी आर टी साने इन्स्टिट्यूट (ठाणे) व माधवबाग हॉस्पिटल, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या अभ्यासक्रमात त्यांनी सहभाग घेतला.
शोधनिबंध (थिसीस) सादर करताना त्यांना डॉ. जगदीश हिरेमठ (रूबी हॉल पुणे), डॉ. मनिषा घुरडे (माधवबाग, खोपोली) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
