अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- खान्देशातील हजारो भाविकांना पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुलभ रेल्वेसेवा उपलब्ध व्हावी यासाठी नागपूर, अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूर ही नवीन रेल्वेगाडी आठवड्यातून दोन दिवस सुरू करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने खासदार स्मिता वाघ यांच्याकडे करण्यात आली आहे.
४ जुलै २०२५ रोजी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर पंढरपूर वारीसाठी भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या खासदार स्मिताताई वाघ यांना रयत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सध्या नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस (गाडी क्र. ११४०३/११४०४) अकोला, परभणी, लातूर मार्गे चालते, मात्र ती खान्देशातून जात नाही. त्यामुळे या गाडीच्या दोन फेर्या नागपूर, भुसावळ, मनमाड, दौंड, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरकडे वळवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
वारकऱ्यांची होणारी गैरसोय
थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने खान्देशातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी ३-४ ठिकाणी गाड्या व प्लॅटफॉर्म बदलावे लागतात. यामुळे विशेषतः वयोवृद्ध भाविकांना शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी, अनेक भक्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनास मुकतात.
रयत सेनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली अपेक्षा
खासदार स्मिता वाघ या जळगाव मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून त्यांच्याकडून भाविकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे योग्य पाठपुरावा करून ही गाडी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर स्वाक्षरी केलेली प्रमुख नावे:
गणेश पवार (संस्थापक अध्यक्ष, रयत सेना), स्वप्नील गायकवाड, बाळासाहेब पवार, सतीश पवार, योगेश गव्हाणे, श्रीकांत पवार, भूषण पवार, विजय महाजन, स्वप्नील देशपांडे, विजय सूर्यवंशी, तुळशीदास कदम, गौरव पवार, सागर यादव, रवींद्र पगार आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोळे, जि.प. सदस्य धर्मा वाघ, नगरसेविका विजया पवार व इतर पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.
