अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – अँग्लो उर्दू हायस्कूल, चाळीसगाव येथे बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी व संबंधित संस्थेचे सभासद सैय्यद सलीम सैय्यद अय्यूब यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. अॅड. संदीप जी. सोनार यांच्या माध्यमातून ही रजिस्टर नोटीस १६ जुलै रोजी संबंधित शैक्षणिक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
कायदेशीर नोटीस पाठविणारे संस्थेचे सभासद सैय्यद सलीम सैय्यद अय्यूब
या नोटीशीत नमूद केल्याप्रमाणे, १५ जुलै २०२५ रोजी अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये घेतलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, सदर शाळा सध्या कोणत्याही अधिकृत चेअरमन अथवा शालेय समितीविना कार्यरत आहे, असा दावा करण्यात आला आहे.
नोटीसीमध्ये मुख्याध्यापक आसिफखान शब्बीरखान व इतर व्यक्तींवर शासनाची फसवणूक करीत, खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरती प्रक्रिया राबवल्याचा गंभीर आरोप आहे. याव्यतिरिक्त, मागील वर्षांपासून कार्यरत असलेल्या सरप्लस शिक्षकांना डावलून नवीन शिक्षकांची बेकायदेशीर भरती करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्याकडे यापूर्वीही तक्रारी दाखल करण्यात आल्या असून अद्याप योग्य कार्यवाही न झाल्याने, भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी सदर नोटीशीतून करण्यात आली आहे. अन्यथा, दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नोटीशीत देण्यात आला आहे.

