अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी रविवारी शहरातील सुप्रसिद्ध अभ्यासिका दीपस्तंभ येथे भेट देऊन यूपीएससी व एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या या भेटीमुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन, परीक्षेतील यशासाठी आवश्यक असलेले सातत्य व शिस्त, तसेच तयारीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या प्रभावी उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. “यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा, सातत्यपूर्ण परिश्रम, आणि स्वतःवर अबाधित विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासात गतीसोबतच गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी तयारीच्या काळात मानसिक संतुलन जपणे, सोशल मीडियाचा संयमित वापर, शारीरिक तंदुरुस्ती व वाचनाची सवय जोपासणे या गोष्टींवर भर दिला. “प्रत्येक दिवशी ठराविक उद्दिष्ट ठेवा, त्याची पूर्तता करा आणि प्रगतीचे स्वतः मूल्यमापन करा. अडचणी आल्या तरी हार न मानता पुढे जात राहणे हेच खरी स्पर्धा आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना अभ्यासातील समस्यांबाबत प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित उदाहरणांसह उत्तरे देत त्यांना प्रोत्साहन दिले. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्यांनी जिल्हाधिकारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
दीपस्तंभ अभ्यासिकेच्या वतीने जिल्हाधिकारी प्रसाद यांचे स्वागत करून त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी दीपस्तंभचे संस्थापक, मार्गदर्शक मंडळी व मोठ्या संख्येने स्पर्धार्थी उपस्थित होते.
