अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
धुळे(प्रतिनिधी)– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदे (ता. जि. धुळे) येथील पदवीधर शिक्षक आणि तात्पुरते मुख्याध्यापक यांच्याकडून लाच घेताना पंचायत समिती धुळे येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांनी ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी श्रीमती नांद्रे यांनी शाळेस भेट दिली असता, त्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचा प्रतिकूल अहवाल वरिष्ठांकडे न पाठविण्याच्या मोबदल्यात आणि शाळेस समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानातून स्वतःस व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांच्याकरीता मिळून एकूण १०,००० रुपयांची लाच मागितली होती.
११ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणीदरम्यान आरोपीने लाचेची मागणी केली असल्याचे उघड झाल्यानंतर, १२ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईत श्रीमती नांद्रे यांनी त्यांच्या कार्यालयातील कक्षात तक्रारदाराकडून १०,००० रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
सदर गुन्हा देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर, सागर शिर्के, प्रितेश चौधरी व रेश्मा परदेशी यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
