अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील मालेगाव-धुळे रोड चौफुली, महाराणा प्रताप चौकाच्या मागे के.आर. कोतकर कॉलेजच्या जुन्या कॅन्टीन शेजारी सर्वे नंबर ४२५/क मधील १.१७ हे.आर. (सुमारे पावणे तीन एकर) जागा स्मशानभूमीसाठी मंजूर करण्यात आली आहे. यापैकी एक एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी १२ जुलै १९९१ रोजी ठराव क्रमांक ११२३ नुसार निश्चित करण्यात आली होती. मात्र ३३ वर्षांनंतरही ही जागा प्रत्यक्षात वापरासाठी खुली करण्यात आलेली नाही.
धुळे रोड, मालेगाव रोड व करगाव रोड परिसरातील पंचशील नगर, शिव कॉलनी, पोस्टल कॉलनी, नवलेवाडी, आदर्श नगर, श्रीकृष्ण कॉलनी, प्रभू रामचंद्र नगर, डेराबर्डी, वामन नगर व शंभोनगर या भागांमध्ये सुमारे ५० ते ६० हजार हिंदू बांधव वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत या सर्वांना अंत्यसंस्कारासाठी ४ ते ५ किलोमीटर दूर घाटरोडवरील स्मशानभूमीकडे जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्वतंत्र स्मशानभूमीची आवश्यकता आहे.
या संदर्भात १० मे २०२३ रोजी संदीप लांडगे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम व नगररचना विभागाकडून आवश्यक अहवाल प्राप्त झाले आहेत. १० जुलै २०२५ रोजी प्रांताधिकाऱ्यांनी नगरपालिकेकडे अंतरिम अहवाल मागवला असून तो पाठवण्यात विलंब होत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
नगरपालिकेने तातडीने आवश्यक अहवाल सादर करून जागा जनतेसाठी खुली करावी, अशी मागणी राष्ट्रीय जनमंच पक्षाने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, प्रदेश सचिव संदीप लांडगे, जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, तालुकाध्यक्ष सुरेश वेळीस, शहर सचिव सचिन शेटे, उपाध्यक्ष शंकर सोनार, सुनील सूर्यवंशी, विजय पाटील, बबलू चौधरी, आतिश पवार व अशोक तिरमली यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
