अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) –आज 21 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास धुळे ते कन्नड या मार्गावर बोरस फाट्याजवळ दोन आयशर गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात सागर ताराचंद चव्हाण (वय २७, रा. सातकुंड, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) या आयशर गाडीचालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर गाडी क्रमांक MH-20 GZ-1267 ही धुळेवरून कन्नडच्या दिशेने जात असताना तिच्या पुढे जाणाऱ्या आयशर गाडी क्रमांक MH-15 HH-5331 याने अचानक रस्त्यावर ब्रेक मारून गाडी थांबवली. त्यामुळे मागून येणारी गाडी (MH-20 GZ-1267) वेगावरच त्याला धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की सागर चव्हाण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. अपघातात आणखी एक इसम जखमी असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली, वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींना उपचारासाठी पाठवले. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.कॉ. विजय शिंदे करीत आहेत.
