अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
यावल (प्रतिनिधी)- दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास रावेर-चोपडा महामार्गावर यावल शहरातील बुरुज चौक, ब-हाणपुर जलेबी सेंटर समोर जबरी चोरीची घटना घडली होती. तक्रारदार रोहित प्रकाश रल (वय 24, धंदा-ड्रायव्हर, रा. चोपडा) हे आपल्या महिंद्रा पिकअप मालवाहतूक वाहनातून प्रवास करत असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन थांबवून, डॅशबोर्डमधील कागदपत्रे व रोख ₹5,000/- रक्कम असलेली पिशवी बळजबरीने हिसकावून घेतली. यावेळी तक्रारदारास मारहाण देखील करण्यात आली होती.
या घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 342/2025, भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 309(6), 3(5) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या गंभीर घटनेच्या तपासासाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी विशेष सुचना दिल्या होत्या.
गोपनीय माहिती व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तपास पुढे नेल्यानंतर सदर गुन्हा हा समशेर शहा सलीम शहा (वय 27, रा. बाहेरपुरा यावल, मूळ रा. पंचशीलनगर भुसावळ),समीर रहेमान तडवी (वय 22, रा. तडवी कॉलनी, यावल) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी क्रमांक 1 समशेर यास जळगाव येथील गेंदालाल मिल परिसरातून तर आरोपी क्रमांक 2 समीर यास यावल येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी जबरी चोरीस गेलेली रोख रक्कम ₹5,000/- हस्तगत केली आहे.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली स. फौ. विजय पाचपोळे, पोहेकों वासुदेव मराठे, पोहेकों निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोकों अर्षद गवळी, पोकों ऐजाज गवळी, पोकों अनिल साळुंखे, पोकों सागर कोळी (यावल पो. स्टे.) यांनी ही कामगिरी केली.
यातील आरोपी समशेर शहा सलीम शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन येथे चोरीचे, तर बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथे जबरी चोरी, घरफोडी तसेच विनयभंग-अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
