अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जिल्हा परिषदेच्या हिंगोणे येथील ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला क्लस्टर मॉडेल स्कूल म्हणून विकसित करून त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणार – आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील भडगाव रोड वरील अंधशाळा चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी खासदार स्मिताताई वाघ, विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, महात्मा फुले स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच माळी समाज बांधव व फुलेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छगन भुजबळ : “स्मारकाची स्वच्छता समाजाची जबाबदारी”

या वेळी आपल्या मनोगतात मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या स्मारकामुळे समाजाला प्रेरणा मिळेल. मात्र या स्मारकाची स्वच्छता व जपणूक ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “केंद्र सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय वंचित घटकांना न्याय मिळवून देणारा आहे. यामुळे मागास समाजाला राजकीय व सामाजिक समानतेचा मार्ग खुलेल.”
गिरीश महाजन : “स्मारक म्हणजे प्रेरणेचं शिलालेख”

या कार्यक्रमात बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “योग्य नेतृत्व, ठाम भूमिका आणि सकारात्मक शासन असेल तर अशक्य काहीच नाही. स्मारक म्हणजे केवळ इतिहासाचा सन्मान नाही, तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचं शिलालेख आहे.”
त्यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले की, “ज्यांनी अंधार दूर केला त्यांना आठवा, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांचा विचार जपा. व्यसनमुक्त तरुणाईच देशाला महासत्ता बनवू शकते.”
स्मारकासाठी त्यांनी १ कोटी रुपयांऐवजी २ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी केवळ ४८ तासांत शासन निर्णय काढून निधी मिळवला. निवडणूक आचारसंहितेसह विविध अडचणींवर मात करत केवळ १० महिन्यांत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात आले, हे त्यांनी कौतुक करावे असे कार्य केले आहे.
मंगेश चव्हाण : “द्वेष नव्हे, प्रेरणेची फुले उधळली”

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मारक उभारणीचा संपूर्ण घटनाक्रम उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले की, “चाळीसगाव शहरात विविध महापुरुषांची स्मारके व चौक उभारणी करत असताना काही मंडळींनी फुले स्मारकाच्या मागणीच्या आडून समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने कुणाच्याही भूलथापाना बळी न पडता ‘हे काम फक्त मंगेश दादा करू शकतात’ असा विश्वास दाखवला. परिणामी द्वेषाचे विष पसरवण्या ऐवजी प्रेरणेची फुले उधळली गेली.”
तसेच त्यांनी पुढे जाहीर केले की, “केवळ स्मारक बांधून थांबायचे नाही, तर फुले दांपत्याने दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. त्यासाठी माझ्या हिंगोणे गावातील जिल्हा परिषद शाळेला क्लस्टर मॉडेल स्कूल म्हणून विकसित करून त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणार आहे.”
योगेश टिळेकर : “५० वर्षांची मागणी पूर्ण”

प्रमुख अतिथी विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, “शेकडो वर्षांची शिक्षण परंपरा लाभलेल्या चाळीसगाव शहरात फुले दांपत्यांचे स्मारक उभे राहणे ही अभिमानाची बाब आहे. गेल्या ५० वर्षांपासून स्मारकाची मागणी होती. निवडणुकीआधी माळी समाजाने जो संकल्प केला होता तो आमदार मंगेश चव्हाण यांनी पूर्ण करून दाखवला.”
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात उद्धवराव महाजन, डॉ. संजय माळी, सचिन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या धडपडीचे कौतुक केले.
