अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
भुसावळ(प्रतिनिधी)– नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मिसिंग रजिस्टर क्र. २५/२०२५ मधील १८ वर्षीय जय संजयकुमार जावरे (रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ) याचा दोन महिन्यांनंतर यशस्वी शोध लागला आहे. जय हा १७ जुलै २०२५ रोजी नशिराबाद येथून कोणास काही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता.
या प्रकरणात मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले होते.
तपासादरम्यान कोणताही धागादोरा मिळत नसताना पथकाने सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने मुलाचे बँक व्यवहार तपासले. त्यातून व्यवहार ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरी येथून झाल्याचे लक्षात आले. त्यावरून तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी पुरी येथे प्रत्यक्ष जाऊन दोन दिवस अखंड शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नानंतर अखेर जय जावरे याचा शोध घेण्यात यश आले.
दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजे तब्बल दोन महिन्यांनंतर जयला सुखरूप परत आणण्यात आले व त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या कार्यासाठी नशिराबाद पोलिसांचे तसेच संबंधित तपास पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
या तपास पथकात सहा. फौज. राजेश मेंढे, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल, पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे, पोकॉ. प्रकाश कोळी यांच्यासह सायबर पोलिसातील पो.हे.कॉ. शिवनारायण देशमुख, दिलीप चिंचोले, पो.ना. सचिन सोनवणे व पो.कॉ. दिपक सोनवणे यांचा विशेष सहभाग होता.
हे कार्य नशिराबाद पोलिसांच्या दक्षता, तांत्रिक तपास कौशल्य आणि अथक परिश्रमांचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
