अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
घरफोडीतील फरार आरोपी अखेर शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नेरी नाका परिसरातून शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीतील फरार आरोपी सदबीरसिंग बलमतसिंग टाक यास शिताफीने ताब्यात घेत जेरबंद करण्यात यश मिळवले. तब्बल वर्षभरापासून पोलिसांना चकवा देत पळून असलेला सदबीरसिंग अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
सदबीरसिंगविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल असून, याशिवाय जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर, जळगाव तालुका, जामनेर तसेच गुजरातमधील सुरत पोलिस ठाण्यातही घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. गुन्हेगारी जगतात त्याचे मोठे नेटवर्क असून, पोलिसांच्या रडारवर तो बराच काळ होता.
गेल्या वर्षभरापासून सदबीरसिंग फरार राहून पोलिसांना चकवा देत होता. मात्र शनिपेठ पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेमकी माहिती मिळवत कारवाई केली आणि त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर सदबीरसिंगला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वी त्याचे साथीदार अटकेत असून, मुख्य सूत्रधार मात्र फरार होता.
या कारवाईत शनिपेठ पोलिस पथकातील हे.कॉ. अल्ताफ पठाण, योगेश जाधव, अमोल वंजारी, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी विशेष मेहनत घेत सहभाग नोंदवला.
यामुळे घरफोडी गुन्ह्यातील तपासाला चालना मिळाली असून, परिसरातील नागरिकांनीही पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.
