अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणांहून गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याची मोहीम सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या मोहिमेत तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांचे ६२ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतिष गोराडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आली.
या मोहिमेसाठी सायबर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. किरण वानखेडे, हेमंत महाडीक, पोना. सचिन सोनवणे, पोकॉ. पंकज वराडे, गौरव पाटील, मिलींद जाधव, दिपक पाटील आदींचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन गहाळ मोबाईलचा तपास केला. सखोल तांत्रिक तपासातून एकूण ६२ मोबाईल हस्तगत करण्यात आले, ज्यांची एकत्रित किंमत अंदाजे ₹१२,५०,००० आहे.
सदर सर्व मोबाईल फोनचे आज जळगाव येथे मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मालकांना वाटप करण्यात आले.
या मोहिमेत सायबर शाखेच्या दक्षतेचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.
गहाळ मोबाईलचे IMEI क्रमांकासह संपूर्ण माहिती जळगाव पोलीसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आली आहे.
“गहाळ मोबाईल त्वरित शोधता यावेत यासाठी CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर आपला मोबाईल गहाळ झाल्याची माहिती नोंदवा. यामुळे पोलिसांना मोबाईल शोधण्यास मोठी मदत होते.- पोलिस अधिक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी
