अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात रविवारी रात्री उशीरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. सलग दुसऱ्यांदा शहरात गोळीबाराची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कांचन नगरातील विलास चौकात आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर कोळी यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन अखेर गोळीबारापर्यंत पोहोचला. आकाश सपकाळे आणि त्याचा साथीदार करण उर्फ तांडव राजपूत यांनी पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच गणेश रवींद्र सोनवणे, तुषार रामसिंग सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे तिघे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी MIDC परिसरात अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला अजून आठवडा ही लोटलेला नसताना पुन्हा शहरात गोळीबार होऊन एकाचा बळी गेल्याने जळगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. डीवायएसपी नितीन गणापुरे, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी रात्री उशिरापर्यंत तपासाची चक्रे फिरवली. घटनेबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
