अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहर पोलीस स्टेशनकडून सन २०२६ हे वर्ष “चाळीसगाव सुरक्षित शहर” या संकल्पनेखाली काम सुरू करण्यात आले असून, त्या अंतर्गत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती, मोक्याच्या ठिकाणी बँका, सराफ बाजार, मुख्य मार्केट, बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात नियमित गस्त तसेच संशयित इसमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागातून कॉलनी व मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चाळीसगाव शहर पूर्वीपासून शांतताप्रिय म्हणून ओळखले जात असले तरी, अलीकडील काही घटनांमुळे वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर रात्रगस्त व पेट्रोलिंगदरम्यान बारकाईने नजर ठेवून दररोज तपास करण्यात येत आहे.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ५४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१(१)(२), ३(५) सह भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी दिपक सुभाष मरसाळे (रा. सुवर्णताई नगर, चाळीसगाव) व अतुल गोकुळ कसबे (वय २२, रा. इंदिरा नगर, बस स्टँडच्या मागे, चाळीसगाव) यांना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ विनोद पाटील, भुपेश वंजारी व गोपाल पाटील यांनी शिताफीने सापळा रचून धुळे रोड परिसरातून अटक केली. आरोपींना न्यायालयाकडून ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून सखोल तपास करण्यात आला. तपासादरम्यान त्यांच्याकडून २ गावठी कट्टे व २ जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले.
अधिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे प्रथमेश लक्ष्मण भामरे (रा. स्वामी समर्थ नगर, नागद रोड, चाळीसगाव) व अमिर शेख शमशोद्दीन शेख (रा. नागद रोड, पाण्याच्या टाकीजवळ, चाळीसगाव) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करून घरझडती पंचनामा केला असता प्रथमेश भामरे यांच्या घरी १ गावठी कट्टा व २ जिवंत राऊंड मिळून आले.
याप्रकरणी पो.कॉ./३६९ मोहन बापुराव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ५५४/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ५, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण ३ गावठी कट्टे (पिस्टल), ६ जिवंत राऊंड व ४ खाली पोकळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक), मा. कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक) व मा. विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ २४३ विनोद पाटील, पोहेकॉ २८४१ भुपेश वंजारी, पोहेकॉ २८४४ नितीन वाल्हे, पो.कॉ./३६९ मोहन सूर्यवंशी, पो.कॉ./७४ नरेंद्र चौधरी, पो.कॉ./२४०० राकेश महाजन, पो.कॉ./१५४२ विलास पवार, पो.कॉ. २०१३ गोपाल पाटील व म.पो.कॉ./३४७४ मयुरी शेळके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
