अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जळगाव(प्रतिनिधी)-दि. १५ डिसेंबर २०२५ — जळगाव पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी श्री. चामुंडमाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील पदमांलय मल्टीपर्पज हॉल येथे ‘आरोग्य कवच’ या नावाने मोफत होमिओपॅथी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. आव्हाड यांच्या उपस्थितीत या शिबिराची सुरुवात झाली. या शिबिरास पोलीस कर्मचारी, महिला पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २६० हून अधिक पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांनी विविध आरोग्य तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला. शिबिरात मोफत होमिओपॅथी तपासणी व औषधोपचार, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, टी.टी. लसीकरण, रक्तगट तपासणी तसेच मोफत नेत्र तपासणी आदी सेवा देण्यात आल्या.
विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी केली असून त्यात डॉ. सुरेश अग्रवाल (सांधेदुखी व अस्थिरोग), डॉ. सिद्धेश्वर पाटील (दीर्घकालीन आजार व मेडिसीन), डॉ. अमिता श्रीवास्तव (स्त्रीरोग व मेडिसीन) तसेच नेत्रचिकित्सक श्री. जयेश वाल्हे यांचा सहभाग होता. औषध वितरणाची जबाबदारी मेडिसिन डिस्पेंसर श्रीमती फर्जाना बी. बागवान यांनी पार पाडली तर लॅब पॅथॉलॉजी तपासण्या श्रीमती फाल्गुनी सोनवणे व आकाश सोनवणे यांनी केल्या. शिबिराच्या नियोजन व समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी (PRO) श्री. नवल परदेशी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच महाविद्यालयातील सिनिअर व ज्युनिअर प्रशिक्षणार्थींनी रुग्ण नोंदणी, मार्गदर्शन, लसीकरण, बीपी व तापमान तपासणी आणि औषध वितरण या कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले.
