अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ वॉटर सप्लाय जवळ गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत ‘अधिकार आमचा’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल प्रशासनाने आज संध्याकाळी तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी पुन्हा कारवाई केली.अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नदीपात्रात जाणारे मार्ग बंद करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने पुन्हा खड्डे केले.
काही दिवसांपूर्वीही महसूल विभागाने अशाच प्रकारची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर खड्डे बुजवून पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या सहाय्याने वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत ‘अधिकार आमचा’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पुन्हा खड्डे करून अवैध वाहतुकीसाठी वापरला जाणारा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याचे दिसून आले.
मात्र, केवळ खड्डे करून प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. अवैध वाळू उपसा पूर्णपणे थांबविण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे सातत्याने गस्त, वाहनांवर कारवाई आणि संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान,या कारवाईनंतर मेहुणबारे परिसरातील गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा खरोखरच थांबतो का, की पुन्हा वाळूमाफिया सक्रिय होतात, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
