मायभूमीत झालेल्या सत्काराचा आंनद वेगळा – सौ.शुभांगी ताई केदार – मोरे
शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक सौ.शुभांगी मोरे व बस आगारातील महिला वाहक – कर्मचाऱ्यांचा सत्कार
चाळीसगाव – महिलांनी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिला विमान, जहाज चालवू शकतात. मग एसटी का नाही असा विचार सतत मनात असायचा. यासाठी मला वडील व पतीचे पाठबळ मिळाले. एसटीची चालक-वाहक झाल्याचा मला अभिमान वाटतो. यात कोणताही कमीपणा मुळीच वाटत नाही, आज माझं माहेर आणि सासर असणाऱ्या मायभूमीत सत्कार झाल्याने खूप आंनद वाटत असल्याची भावनिक प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक सौ.शुभांगी केदार – मोरे यांनी दिली. त्या चाळीसगाव बस आगारात शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होत्या. चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील शुभांगी केदार-मोरे या जिल्ह्यातील पहिल्या एसटी बसच्या चालक झाल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.सोनिया संदिप निकम, चाळीसगाव बस आगाराचे व्यवस्थापक संदीप निकम यांच्यासह नगरसेविका सौ.विजयाताई भिकन पवार, भाजपा तालुका उपाध्यक्षा सौ.अनिताताई सुदाम चव्हाण, भाजपा चिटणीस सौ.वर्षाताई दिपकसिंग राजपूत, सौ.मनिषा रत्नाकर पाटील, सौ.सोनलताई वाघ, सौ.जयश्रीताई रणदिवे, सौ. भाग्यश्रीताई घोंगडे, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष कवी रमेश पोतदार आदी उपस्थित होते.
यावेळी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिला दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत असतात. शुभांगीताई यांनी एका जोखिमीच्या क्षेत्रात पाउल ठेवण्याचे धाडस केले ते आदर्शवत असून अश्या कर्तुत्ववान महिलांच्या हातात भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
चाळीसगाव आगारातील ३० महिला वाहक – कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार
चाळीसगाव बस आगारात बस वाहक व विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. आयोजकांच्या वतीने उपस्थित प्रमुख अतिथी व कर्मचारी महिलांना भगवे फेटे बांधण्यात आल्याने कार्यक्रमाची शोभा वाढत होती. यावेळी आकर्षक टिफिन बॉक्स व पाणी थंड राहण्यासाठी उपयोगात येणारी थर्मास बॉटल शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आशा उद्धव निकम यांनी केले तर प्रास्ताविक सौ.दिपाली कावेश पाटील यांनी केले.
तसेच सौ.पूनम बीडकर, सौ.शोभा आगोणे, सौ. नैना देवरे सौ. मनिषा पगारे यांनी मनोगत व्यक्त केले.
शुभांगी केदार-मोरे या डीएड पदवीधारक असून, काही वेगळे करण्याची इच्छा तसेच पती व वडिलांच्या पाठबळावर त्यांनी पाऊल उचलल्याचे त्या सांगतात. शुभांगी केदार-मोरे यांचे पती सूरज अशोक मोरे हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथील रहिवासी असून, वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत आहेत.