अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जळगाव-भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकाला अडवून चाकूने वार करत जबरदस्तीने लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास फिर्यादी मुकेश रामराव राठोड (वय ३०, रा. गांधी चौक, हरीओम नगर, महानगरपालिका मागे, जालना) हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र. MH-21-BH-3536) घेऊन पाळधी परिसरातून जात होते. त्यावेळी चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी ट्रक अडवला. मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या व त्याच्या साथीदारांनी ट्रकवर दगडफेक केली.
यानंतर आरोपींनी ट्रक चालक व क्लीनरला बेदम मारहाण केली. यावेळी एका आरोपीने चालकाच्या उजव्या हातावर चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली तसेच मोबाईलवरील फोनपे (PhonePe) द्वारे ९८४ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी चालकावर सध्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तात्काळ डीबी पथकाला तपासासाठी रवाना केले. पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या १२ तासांत तीन मुख्य आरोपींना अटक करून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
अटक आरोपी
साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (वय २६)
रा. भवानी मंदिरासमोर, पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव (मुख्य आरोपी)
विशाल चुडामण पाटील (वय १८)
रा. हॉटेल साई पॅलेस मागे, बिबा नगर, जळगाव
मोहित हेमंत गुजर (वय १९)
रा.प्लॉट नं. ४५, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव
एक विधीसंघर्षित बालक (ताब्यात)
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे बस अडवून चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अपराध क्र. ३९९/२०२२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
तसेच आरोपी विशाल चुडामण पाटील याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही यशस्वी कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस हवालदार प्रदीप राजपूत, योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोह चालक पंकज देशमुख, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे आणि गणेश पाटील यांच्या पथकाने केली.
या धडक कारवाईमुळे जळगाव तालुका पोलिसांनी गंभीर स्वरूपाच्या लुटीच्या गुन्ह्याचा जलद छडा लावत आरोपींना गजाआड केले असून परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
