अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहराला अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने ‘ग्रीन चाळीसगाव सुंदर चाळीसगाव’ या सामाजिक उपक्रमांतर्गत शहरात आतापर्यंत ४०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून पर्यावरण संवर्धनासाठी हा आदर्श उपक्रम ठरत आहे.
टीमच्या वतीने नागरिकांना वाढदिवस, पुण्यस्मरण, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर विशेष प्रसंगी वृक्ष लागवड करून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक स्वखर्चाने वृक्ष लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारत आहेत.
विशेष म्हणजे, ज्या नागरिकांच्या अंगणात किंवा परिसरात वृक्ष लावले जात आहेत, तेच त्या वृक्षांच्या पाणीपुरवठा करून संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत आहेत. तसेच संरक्षण जाळी व इतर आवश्यक खर्चासाठीही नागरिक मोठ्या मनाने पुढाकार घेत असल्याने हा उपक्रम अधिक बळकट होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प टीमने केला असून, “चाळीसगावकरांनी चाळीसगावकरांसाठी” सुरू केलेल्या या हरित चळवळीमुळे शहराच्या पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा मिळत असल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
