पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचे सेवन विनाकारण करने अयोग्य आहे. ताप असल्यास या गोळ्यांचे सेवन करता येते, मात्र, या गोळ्या जादा दिवस सेवन केल्यास त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. – डॉ.मधूकर गायकवाड, अधिक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय |
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल तपासणी केली जाते. या तपासणीत प्रवाशाच्या शरीराचे तापमान 99 पेक्षा जास्त आढळून आल्यास, त्या प्रवाशाची विलगीकरण सेंटरमध्ये थेट रवानगी होते. मात्र विलगीकरणापासून वाचण्यासाठी अहमदाबाद विमातळावर प्रवाशांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. तपासणीपुर्वीच शरीराचे तापमान कमी करण्यासाठी हे प्रवासी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेत असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वच विमानतळावर देशाबाहेरील प्रवाशांची कसून तपासणी होत आहे.
काही कोरोना बाधित देशातून प्रवासी देशात दाखल झाल्यामुळे कोरोनाची साथ सुरु झाली होती. त्यामुळे या सर्वांना थर्मल वैद्यकीय तपासणी प्रक्रीयेतून पुढे जावे लागत आहे. या तपासणीत सर्दीताप, खोकल्याची लक्षणे आढळून आल्यास संबधित प्रवाशाला 14 दिवसासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. मात्र विलगीकरणाची प्रक्रीया टाळण्यासाठी अनेक प्रवाशी खुशाल पॅरासिटामॉलच्या गोळ्या खात आहेत. त्यामुळे अहमदाबाद विमानतळावर वैद्यकीय चाचणीत आजपर्यंत एकही संशसित प्रवासी आढळून आलेला नाही. अहमदाबाद येथील विमानतळावरील सुत्रांच्या माहिती नुसार थर्मल तपासणीच्या काही वेळेपुर्वी प्रवासी या गोळ्या खात आहेत. ही शक्कल लढवून या प्रक्रीयेतून सुटका झाल्यावर हे प्रवासी गुजरातमध्ये बिनधास्त फिरत आहेत. मात्र आजपर्यंत या विमानतळावर एकही प्रवासी संशयास्पद आढऴून का आला नाही याची दखल आरोग्य विभाग किंवा विमानतळ प्रशासनाने अजूनपर्यंत घेतलेली नाही. विमानतळावरून तपासणीत प्रवासी निगेटिव्ह आढळल्यानंतर प्रवाशांची सुटका होऊन सर्रास शहरामध्ये वावरत आहे.त्यामुळे भविष्यात गुजरात मध्ये कोरोना विषाणू बाधीत नागरिकांची संख्या वाढण्याची भिती विमानतळावरील सुत्रांनी व्यक्त केली आहे. मुंबई विमानतळावरही सुरुवातीला दुबई, इराणमधूम बाहेरुन आलेल्या प्रवाशांची व्यवस्थित वैद्यकीय तपासणी न केल्यामुळे याच प्रवाशांकडून पुढे अनेक जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ही घटना ताजी असतांनाही विमानतळ प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, हे विशेष