अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – खेर्डे गावात घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे ५० हजार रुपये रोख व मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश रामेश्वर पाटील (वय ३९, व्यवसाय शेती, रा. शिंगटे मळा, चाळीसगाव, मूळ रा. खेर्डे) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी गणेश पाटील हे आपल्या वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना उपचारासाठी १० जून रोजी आराध्य हॉस्पिटल चाळीसगाव येथे दाखल करून दिनांक १६ जून रोजी त्यांचा डिस्चार्ज घेण्यासाठी खेर्डे येथील घराला कुलूप लावून चाळीसगाव येथे आले होते. वडिलांचा डिस्चार्ज घेऊन ते त्यांचे चाळीसगावात असलेल्या घरीच सर्वजण राहिले होते.
दरम्यान, १८ जून रोजी सकाळी ६ वाजता त्यांच्या काका धनराज पाटील यांचा फोन आला की, खेर्डे येथील घराचा दरवाजा उघडा आहे. त्यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गणेश पाटील व त्यांच्या पत्नीने मोटारसायकलने तत्काळ खेर्डे गावी धाव घेतली. घरात प्रवेश करताच सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरूममधील लोखंडी कपाट उघडे होते आणि कपाटातील लॉकरमधून ५० हजार रुपये रोख व सुमारे ६०० रुपये किमतीचा लावा कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला होता.
ही घटना १६ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून ते १८ जून सकाळी ६ वाजेदरम्यान घडली असून अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत.
