अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– शहरातील अंमली पदार्थ विरोधात स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी कारवाई करत मेहरुण परिसरात सापळा लावून ६०,००० रुपयांचा स्फटीक मेथ एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनाक्रम असा की, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मेहरुण येथील जे.के. पार्क स्विमींग पुलाजवळ अंमली पदार्थ विक्रीसाठी एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती पोहवा अकरम शेख यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार पो.उ.नि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एम.आय.डी.सी. पोलीसांच्या मदतीने पथकाने सापळा लावून संशयित इसमास ताब्यात घेतले.
तपासात आरोपी मेहमुद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याच्याकडून दोन पारदर्शक पिशव्यांमध्ये ६ ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आले. या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे ६०,००० रुपये असून त्याच्याकडून २२,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले. मेहमुदने चौकशीत हा माल अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक, मेहरुण, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
दरम्यान, याच दिवशी गुन्हे शाखेने सुरत येथील अंमली पदार्थ प्रकरणातील फरार आरोपी नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला देखील ताब्यात घेतले. तो सुरत शहरात दोन आठवड्यांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या १९८ ग्रॅम एम्फेटामाईन प्रकरणात फरार होता. त्याला सुरत सिटी क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आले असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे आभार मानले आहेत.
नागरिकांनी अंमली पदार्थ विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा टोल-फ्री क्रमांक ११२ वर कळवावे, असे आवाहन जळगाव पोलीसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. अशोक नखाते (अप्पर पोलीस अधीक्षक), मा. नितीन गणापुरे (अप्पर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये श्री. राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा), श्री. बबन आव्हाड (पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी.), सपोनि गणेश वाघ, पो.उ.नि. शरद बागल तसेच पथकातील सफौ अतुल वंजारी, पोहवा अकरम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, सलीम तडवी, पोना किशोर पाटील, पोशि गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिध्देश्वर डापकर, रविंद्र चौधरी व चापोशि महेश सोमवंशी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला
