अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
दिल्ली चाळीसगाव- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मूळ जामदा गावातील रहिवासी असलेले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. एकनाथ मोतीलाल माळतकर यांना जलसंधारण आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रतिष्ठित ‘जलप्रहरी पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या हस्ते त्यांना सहपत्नीक सन्मानित करण्यात आले.
‘मिशन ५०० कोटी पाच पाटील’ची यशोगाथा:
श्री. माळकर यांनी ‘मिशन ५०० कोटी पाच पाटील’ या संकल्पनेतून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली. जामदा (ता. चाळीसगाव) येथून सुरू झालेले हे काम आज महाराष्ट्र राज्यातील २० हून अधिक गावांपर्यंत पोहोचले आहे. सरकारी योजनांवर अवलंबून न राहता, त्यांनी भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन, सकाळ रिलीफ फंड अशा स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीने व लोकसहभागातून जलसंधारणाचे मोठे काम उभे केले.
कामाचे स्वरूप आणि परिणाम:
त्यांच्या कामांमध्ये नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, बांधबंधिस्ती आणि शेततळे तयार करणे या प्रमुख कामांचा समावेश आहे.
व्यापकता: जामदा, भऊर, रहिपूरी, चांदे, सायगव्हाण, नेरी यांसह बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील गावांमध्ये त्यांनी काम केले.
जलसाठा: एकट्या जामदा गावात त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे ७० कोटी लिटर जलसाठा तयार झाला आहे.
सामाजिक बदल: यामुळे भूजल पातळी वाढली, विहिरींना बारमाही पाणी उपलब्ध झाले, दुबार पिके घेणे शक्य झाले, पशुधन वाढले आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून स्थलांतर थांबले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. माळकर यांनी, “हा पुरस्कार केवळ माझा नसून, जलसंधारणाच्या कामात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या हजारो शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा आहे,” अशी कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानाबद्दल जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
