अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तरवाडे ता. चाळीसगाव येथील इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असलेली कु. धनश्री उमेश शिंदे ही विद्यार्थिनी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची अत्यंत चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिंदे कुटुंबियांसह ग्रामस्थांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी आज तरवाडे येथे प्रत्यक्ष भेट देत शिंदे कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासकार्याचा सविस्तर आढावा घेतला. पोलीस प्रशासन व गावातील नागरिकांनी संयुक्तपणे आजूबाजूचा परिसर, शेतशिवार तसेच सर्व शक्य ठिकाणी शोधमोहीम तीव्र केली असून प्रत्येक शक्यता तपासली जात आहे.
या प्रकरणात कोणतीही कसूर राहू नये यासाठी प्रशासनाने अत्यंत तत्परतेने व गांभीर्याने काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या आहेत. कु. धनश्री लवकरात लवकर सुरक्षित सापडो, हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास व माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
