अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे सुलेमान रहीम खान पठाण (वय २१) या तरुणावर झालेल्या अमानुष सामूहिक मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुलेमानचा मृत्यू झाला असून, जळगाव जिल्हा एकता संघटनेने याविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींवर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात एकता संघटनेने दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
१) घटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी एसआयटीमार्फत करावी.
२) दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून भारतीय न्याय संहितेनुसार ९० दिवसांत चार्जशीट दाखल करावी.
३) पीडिताच्या कुटुंबास किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी.
४) मानवाधिकार आयोग व अल्पसंख्याक आयोग यांनी स्वतः लक्ष घालावे.
५) गावात पोलिस बंदोबस्त वाढवून धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी ठोस पावले उचलावी.
संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला इशारा दिला की, दोषींवर कारवाई न झाल्यास व पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सदर निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना अशोक लाड वंजारी यांनी तर अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना मतीन पटेल यांनी सुपूर्द केले. तसेच अल्पसंख्याक आयोग, मानवाधिकार आयोग आणि मंत्री गिरीश महाजन यांना प्रशासनामार्फत व थेट निवेदन पाठवण्यात आले आहे.
या वेळी अशोक लाड वंजारी, फारुक शेख, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान, हाफिज इमरान काकर, जावेद मुल्लाजी, आसिफ इस्माईल, रज्जाक पटेल, कासिम उमर, नजमोद्दीन शेख, आरिफ देशमुख, युसुफ खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
