जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व प्रधान सचिव एकनाथ येवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आपणासमोर या निवेदनाद्वारे मांडत आहे .
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित धोरण लवकरात लवकर जाहीर करावे , व जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करावी .
मा .मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे .ते सुरू करण्याबाबत आपल्या स्तरावरून ताबडतोब सूचना देण्यात याव्यात .तसेच ग्रामविकास विभागातील जे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्हा परिषद पुणे येथील मुख्याध्यापक पदोन्नती बारा वर्षे रखडलेली आहे .त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाचे अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना स्वयं स्पष्ट सूचना देण्यात याव्यात व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात यावी .मुख्याध्यापक पदोन्नती रखडल्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत यापूर्वीच्या निवेदनात आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे .त्याची दखल अद्याप घेतलेली दिसून येत नाही त्याचीही दखल घेण्यात यावी .
सन 2022 च्या बदली प्रक्रियेमध्ये सहाव्या टप्प्यात अनेक जिल्हा परिषद शिक्षकांवर अन्याय झालेला आहे .आपल्या न्याय हक्कासाठी या शिक्षक बांधवांनी न्यायालयात धाव घेतली आहे .न्यायालयाच्या निर्णयाचा व या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या निवेदनाचा सहानभूतीपूर्वक विचार करून सबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेवर कायम ठेवण्यात यावे .सन 2022 च्या बदल्यामध्ये ऑनलाइन झालेली त्यांची बदली रद्द करण्यात यावी .त्यांच्या पूर्वीच्या शाळेवर कायम ठेवण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात .
न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांची बाजू ऐकून घेऊन न्याय द्यावा व सर्व प्रलंबित न्यायालयीन खटले सामोपचाराने माघारी घेण्यात यावेत .
शिक्षकांना 117 प्रकारची असैक्षणिक कामे देण्यात आलेली आहेत .शिक्षकांकडून सर्व शैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत .
विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात यावी . शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम करू द्यावे ,म्हणजे सरकारी शाळातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल .
अनेक जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदल्या थांबल्यामुळे तणावात आहेत .पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात सेवा करत आहेत तर त्यांचे कुटुंबीय तिसऱ्याच जिल्ह्यात आहेत .ही त्यांची समस्या गंभीर आहे .याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण लक्ष देऊन लवकरात लवकर पती-पत्नी एकत्रित करण्यासाठी आंतरजिल्हा बदल्या सुरू करण्यात याव्यात .
अनेक जिल्हा परिषद शिक्षक सेवानिवृत्त होऊन दीड-दोन वर्षे झाली तरी त्यांच्या फंड , ग्रॅज्युएटी व गट विमा यासारख्या रक्कमा अद्याप त्यांना मिळाल्या नाहीत .याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावर योग्य त्या सूचना देण्यात याव्यात .या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात व याबाबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाला माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे