अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
पारोळा (प्रतिनिधी) :दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे अवैद्य देशी दारु कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावाच्या शिवारात बोरी नदीच्या किनाऱ्यालगत लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये ‘टँगो पंच’ नावाचा बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पवार यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत शिताफीने धाड घालून सुमारे ४० लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये तयार देशी दारु, बाटल्या, कच्चामाल स्पिरीट, पॅकींग मशिनरी, टाक्या, लोखंडी शेड तसेच बोलेरो मालवाहू गाडी व स्विफ्ट डिझायर कार यांचा समावेश आहे.
जप्त मुद्देमालाचा तपशील :
तयार टँगो पंच दारु ३,१०० बाटल्या – १.२४ लाख रुपये
विक्रीसाठी तयार होत असलेल्या ७०० बाटल्या – २८ हजार रुपये
स्पिरीट ८०० लिटर – ३.५५ लाख रुपये
१,५०० लिटर तयार दारु – ३ लाख रुपये
ऑटोमॅटीक आर.ओ. सेटअप व CNC मशिन – प्रत्येकी ५ लाख रुपये
बाटल्या, बुच, पॅकींग साहित्य – ७.८७ लाख रुपये
वाहने (बोलेरो व स्विफ्ट डिझायर) – १० लाख रुपये
लोखंडी शेड – ५ लाख रुपये
अन्य साहित्य व उपकरणे – १.३९ लाख रुपये
एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४० लाख ३३ हजार रुपये एवढी आहे.
ही कारवाई करताना पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोउपनि अमोल दुकळे, पोलीस हवालदार सुनिल हटकर, महेश पाटील, डॉ. शरद पाटील, प्रविण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे तसेच पोलीस चालक संजय पाटील व वेलचंद पवार आदींनी सहभाग घेतला.
या प्रकरणात पुढील तपास सुरू असून अवैद्य दारु व्यवसायामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
