अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव दि. 15 – जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभागातून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहिम राबविण्यात येत आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ महत्वाची आहे. या लढाईत नागरीकांनी प्रशासनास साथ देऊन दिलेल्या सुचनांचे पालन केले तर कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळणार आहे. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि कोरोनापासून दूर राहणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेची सुरुवात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील या होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तहसीलदार नितिनकुमार देवरे, सरपंच अलकाबाई प्रकाश पाटील, आशाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महसुल व आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’ आवश्यक
कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हा या मोहीमेचा हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर (स्वसंरक्षण) भर देणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता आदीबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जिल्हाभर जनजागृती करावी. जिल्हा प्रशासनाने संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्तींच्या शोध घ्यावा. लवकरच नवरात्रीचा उत्सव येत असून त्याअनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग आणि इतर दक्षतांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
नागरीकांनी भिती न बाळगता स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी-जिल्हाधिकारी
माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम आजपासून 24 ऑक्टोबरपर्यंत दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या बाबतीत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु नागरीकांनी भिती न बाळगता स्वत:हून पुढे येऊन आपली व आपल्या कुटूंबाची तपासणी करुन घेतली पाहिजे, जेणेकरुन आपण कोरोनाची साखळी लवकरात लवकर तोडू शकतो. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सामाजिक कार्यकर्तांचा सहभाग महत्वाचा आहे. यंत्रणेच्या कामाला सामाजिक संघटनांची जोड मिळाली तर आपला जळगाव जिल्हा लवकरच निरोगी जिल्हा होण्यास मदत होईल. तरी नागरीकांनी आपल्या घरी भेट देणा-या पथकांना सहकार्य करुन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपुर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासुन बचाव करावा. असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोडे म्हणाले की, या मोहीमेअंतर्गत आरोग्य विभागाचा एक कर्मचारी व दोन स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा. या तपासणीत मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेऊन आवश्यकता भासल्यास त्यांची तपासणी व उपचारही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवर तपासणी पथकासोबत नागरीकांच्या घरी जाऊन या मोहिमेत सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी केले.