अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
मेहुणबारे पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी
चाळीसगाव(प्रतिनिधी)- महिलेचा विनयभंग करून तब्बल ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
रांजणगाव शिवारात २.३५ लाखांची वीजतारा चोरी
मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे दिनांक २५/११/२०१६ रोजी गुरनं. ९७/२०१६ भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार, रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव हा गुन्हा घडल्यापासून तब्बल ९ वर्षे फरार होता. महिलांबाबतचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस अटक करणे अत्यंत आवश्यक होते.
फरार आरोपीचा शोध घेत असताना तो मुंबई येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मेहुणबारे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी तातडीने विशेष पथक नेमले. सदर पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अंधेरी, मुंबई येथे सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीस मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई करून त्यास न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महिलांवरील गुन्ह्यांबाबत पोलीस प्रशासनाची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
ही यशस्वी कामगिरी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे (सहायक पोलीस निरीक्षक), पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस हवालदार शांताराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार व संजय लाटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
