अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) — चाळीसगाव शहरातील भडगाव रोड परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय देवचंदराव देशमुख (वय ५८, रा. गजाननवाडी, शास्त्रीनगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दररोजप्रमाणे १७ जून २०२५ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांनी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आपली काळ्या रंगाची टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकल (क्रमांक MH 19 CA-2630) भडगाव रोडवरील खरजई नाका येथील डॉ. कोतकर यांच्या घराजवळ पार्क केली होती. वॉकहून परत आल्यानंतर साधारण सात वाजेच्या सुमारास त्यांनी मोटरसायकलच्या जागी पाहणी केली असता मोटरसायकल तेथे आढळून आली नाही.
या घटनेनंतर संजय देशमुख यांनी प्रशांत पालवे आणि उत्तम जाधव यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी मिळून परिसरात तसेच शहरातील विविध भागात मोटरसायकलचा शोध घेतला. मात्र शोधाशोध करूनही मोटरसायकल मिळून आली नाही. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत.
