अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
चाळीसगाव ग्रामीण कक्षातील ४२ पोलवरील AAAC तारांवर डल्ला, अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव(प्रतिनिधी)-| दि. १० डिसेंबर २०२५ — चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात महावितरणच्या उच्चदाब विद्युत तारांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ गजानन संतोष साबळे (वय ४४, रा. कैवल्य नगर, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात फिर्याद दिली आहे.
माहितीनुसार, दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहाय्यक अभियंता विशाल सोनवणे यांनी रांजणगाव शिवारात वीजतारा चोरीची माहिती दिल्यानंतर साबळे यांनी तातडीने वरिष्ठ तंत्रज्ञ भुषण नाना पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुमारे दुपारी १ वाजता पाटील, कंत्राटी कामगार विकास गांगुर्डे व पृथ्वी जाधव तसेच शेतकऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तारांमध्ये काहीही गैरप्रकार दिसून आला नव्हता. मात्र पाहणीत रांजणगाव येथील बापू गिरधर चौधरी यांच्या शेत गट नं. ४८/०१ जवळील पोलपासून पिंपरखेड शिवारातील मनीषा अण्णा बोराडे यांच्या शेत गट नं. ३४१ पर्यंत २९ पोलवरील, तसेच चौधरी यांच्या शेतासमोरील पोलपासून सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांच्या शेत गट नं. १४१/०२ पर्यंतच्या पोलवरील अशा एकूण ४२ विद्युत पोलवरील अॅल्युमिनियमच्या AAAC ५५ Sq mm तारा तोडून चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
या चोरीत सुमारे ७.५० कि.मी. लांबीच्या AAAC ५५ Sq mm उच्चदाब टारांच्या चोरीमुळे अंदाजे रु. २,३५,४१८ इतकं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दि. ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ ते दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० या कालावधीत ही चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणकडून पर्यायी व्यवस्था व दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
