अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमांच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, चाळीसगाव येथे शहर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना दोन संशयास्पद मोटारसायकली आढळून आल्या.
सदर वाहने शहर वाहतूक शाखा कार्यालयात जमा करून त्यांच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकांची आर.टी.ओ (RTO) चाळीसगाव कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात आली. तपासात दोन्ही मोटारसायकली बनावट नंबर प्लेट लावून चालवल्याचे उघड झाले.
मोटारसायकल क्रमांक MH 19 AM 1764 (Honda Shine)
तपासणीअंती मूळ क्रमांक MH 21 BL 2831 असून मालक सतीश दत्तात्रेय भवर, रा. संजय नगर, जुना जालना यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
मोटारसायकल क्रमांक MH 15 HZ 3257
मूळ क्रमांक MH 15 JR 1196 असून मालक अमन किसन लोट, रा. NMC सोसायटी, उपनगर नाशिक असे आढळून आले.
दोन्ही मूळ वाहनमालकांशी संपर्क साधून चौकशी केली असता, या दोन्ही मोटारसायकली चोरीला गेल्याची माहिती मिळाली. संबंधित वाहनांबाबत आधीच चोरीची तक्रार नोंदविण्यात आलेली होती.
चोरीचा गुन्हा :
मूळ क्रमांक MH 21 BL 2831 असलेली मोटारसायकल चंदनझिरा पोलीस ठाणे (जालना) येथे गुन्हा क्रमांक 310/2021, भादंवि कलम 379 अन्वये चोरीला गेल्याचे तपासात स्पष्ट झाले. आज ही मोटारसायकल चंदनझिरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन :
वाहन खरेदी करताना सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी. तसेच वाहन चालवताना आरसी बुक, इन्शुरन्स, लायसन्स आणि इतर आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे वाहतूक शाखा चाळीसगाव यांनी केले आहे.
पोलीसांची पुढील कारवाई :
चाळीसगाव शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन, गैरकृत्ये व अपघात रोखण्यासाठी पुढेही दररोज विशेष मोहीम राबविण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.
