अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असताना प्रवाशाच्या पँटच्या खिशातील १५ हजार रुपये चोरणाऱ्या तिघा पाकिटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. दि. ०१ डिसेंबर २०२५ रोजी यावल येथील शेख कलीम शेख इसाक वय ५० हे पत्नीच्या उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात आले होते. औषधे खरेदी करून आपल्या गावी जाण्यासाठी अजिंठा चौफुली येथून बसमध्ये चढत असताना त्यांच्या मागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या पँटच्या खिशातील १५ हजार रुपये रोख लंपास केले.
या घटनेनंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता अज्ञात आरोपीविरोधात CCTNS क्रमांक ८७७/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता रजा कॉलनी भागातील काही तरुण संशयाच्या भोवऱ्यात आले.
तपासाअंती रा. अक्सा नगर, बाम्बे बेकरीजवळ राहणारा हमीद अय्युब खान वय २२, शेरा चौक येथे राहणारा समीर खान अफसर खान वय २२ तसेच रजा कॉलनी येथील शोहेब महमूद पटेल वय २३ या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेली रक्कम त्यांच्या जवळ असल्याचे निष्पन्न झाले असून फिर्यादीच्या पँटच्या खिशातून काढून घेतलेले संपूर्ण १५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजय सिंह पाटील, पोलीस हवालदार किरण पाटील, गिरीष पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गिरीष पाटील करीत आहेत.
