Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – पवित्र रमजान महिन्यातील ३० रोजे पूर्ण करत मुस्लिम समाज बांधवांनी दिनांक २१ मार्च रोजी ईद-उल-फित्र हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला. शहरातील ईदगाह व विविध मशिदींमध्ये सकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या आणि बंधुभावाचे दर्शन घडवले.
रमजान महिनाभर मुस्लिम समाजाने संयम, श्रद्धा, प्रार्थना आणि दानधर्म यांचे पालन करत रोजे (उपवास) ठेवले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करून अल्लाहची उपासना केली जाते. या कालावधीत गरजूंना मदत करणे, जकात (दान) देणे, नमाज अदा करणे आणि आत्मशुद्धी साधणे याला विशेष महत्त्व असते. या माध्यमातून मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण होत असल्याची भावना व्यक्त केली जाते.
इस्लाम धर्मात रोजे हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक कर्तव्य मानले जाते. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठ्या निष्ठेने आणि भक्तीभावाने रोजे पूर्ण केले.रमजानच्या शेवटच्या दिवसांत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली, ज्यामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
यंदाच्या रमजानमध्ये प्रेरणादायी बाब म्हणजे अवघ्या ७ वर्षांच्या अरहम समीर खाटिक (रा. त्रिमूर्ती बेकरी जवळ, घाट रोड, चाळीसगाव) या चिमुकलीने संपूर्ण ३० रोजे ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतक्या लहान वयात तिने दाखविलेली जिद्द, श्रद्धा आणि शिस्त ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. तिच्या या कार्याचे कुटुंबीयांसह समाजातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ईदच्या निमित्ताने समाजात बंधुता, एकोपा, प्रेम आणि शांततेचा संदेश देण्यात आला. विविध भागांमध्ये शिरखुरमा व इतर पारंपरिक पदार्थांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला, तर वडीलधाऱ्यांनीही आनंदाने सण साजरा केला.
एकूणच, चाळीसगाव शहरात ईद-उल-फित्र हा सण उत्साह, भक्तीभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून मोठ्या आनंदात पार पडला.
