अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) –दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजे पुर्वी जळगाव शहरातील खेडी शिवारातील शिवनगर परिसरातील शंभू रेसिडेन्सी येथील रविंद्र मगरे यांच्या फ्लॅट क्रमांक ०४ मधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोनं-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रविंद्र मगरे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकात पोउनि राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ निलेश पाटील, विशाल कोळी आणि राहुल रगडे यांचा समावेश होता.
पथकाने केलेल्या तपासाच्या आधारे आरोपी कैलास चिंतामण मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव (दोघेही रा. सोनगीर, जि. धुळे) यांना दि. ३१ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली. मा. न्यायालयाने त्यांना दि. ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान आरोपी कैलास मोरे याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या राहत्या घरी, सोनगीर (ता. धुळे) येथे छापा टाकण्यात आला. यावेळी एकूण ३,८१,५१४/- रुपये किंमतीचे ३८.९३० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १५,६८५/- रुपये किंमतीचे १३५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ३,९७,१९९/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि पोलीस उप अधीक्षक श्री. संदीप गावीत यांचे मार्गदर्शन लाभले. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. राहुल तायडे व पोकॉ. निलेश पाटील करीत आहेत.
