अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुका वि.का. सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत किसनराव जोर्वेकर यांच्या नेतृत्वाखालील “प्रगती पॅनल”ने सर्वच्या सर्व ११ जागांवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत इतिहास रचला आहे. ही निवडणूक १५ जून रोजी चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयात पार पडली.
संस्थेचे विद्यमान चेअरमन, तसेच टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सध्या उपसरपंच पद भूषवणारे किसनराव जोर्वेकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेला हा विजय तालुक्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास ५२ वर्षांनंतर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती, त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते.
विजयी उमेदवारांची नावे,मतदारसंघ व मिळालेली मते
सर्वसाधारण मतदार संघ
किसनराव जोर्वेकर 410,कुंभार शालिग्राम व्यंकटराव 407,चव्हाण संदीप विश्राम 406, पवार दिलीप पांडुरंग 395,बोरसे अनिल रघुनाथ 404,सोनार संजय गबा 402,महिला राखीव गट खलाणे सुनीता भिमराव 425,मांडोळे संगीता कैलास 400
इतर मागासवर्ग (ओबीसी) मतदार संघ
निकम हिम्मत निंबा 421
अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ
सोनवणे गणेश बापू 418
भटके-विमुक्त जाती मतदार संघ
ढगे दगडू रुपचंद 413
या ऐतिहासिक विजयानंतर किसनराव जोर्वेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “हा विजय मतदार बंधू-भगिनी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा आहे. आम्ही यापुढेही संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कारागीर, सभासद यांना कर्जरूपाने आर्थिक सहकार्य करू आणि त्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू.”
निवडणूक प्रक्रियेचे यशस्वी आयोजन
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक परदेशी (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चाळीसगाव) यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शांततामय व पारदर्शक पद्धतीने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
मतदान व मतमोजणीदरम्यान चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त उत्तम राबवण्यात आला.
