अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगांव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर येथील दुकानातून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अखेर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २७,००० रुपये किमतीचे ५० किलो तांब्याचे तार जप्त करण्यात आले आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजता ते २७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत, एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर गेट समोरील दुकान क्र. ४ चे शटर वाकवून त्यातून एकूण १,८५,००० रुपये किमतीचे जुने व नवे तांब्याचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी संबंधित दुकानदाराच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोउनि राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना प्रदीप चौधरी, पोकॉ निलेश पाटील यांचा समावेश होता.
या गुन्ह्यातील दोन आरोपींना २ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपी क्रमांक ३ शिकवणसिंग बरियामसिंग ऊर्फ पटमलसिंग टाक हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी तो वाघनगर परिसरात फिरत असताना सफौ विजयसिंग पाटील आणि पोना प्रदीप चौधरी यांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवून त्याच्याकडून ५० किलो वजनाचे तांब्याचे तार हस्तगत करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे २७,००० रुपये इतकी आहे. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईस पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, पोलीस उप अधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि राहुल तायडे व पोकॉ निलेश पाटील करीत आहेत.
