अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी): चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि लोकशाही पद्धतीने पार पडावी, यासाठी नामनिर्देशन दाखल केलेले उमेदवार घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
पाटील हे शिवकॉलनी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव येथील रहिवासी असून शहर विकास आघाडी (लोकनेते अनिलदादा देशमुख) यांच्या वतीने प्रभाग क. १ मधून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग १ च्या प्रारूप मतदार यादीबाबत त्यांनी दुबार नावे, प्रभागाबाहेरील मतदार, मयत व्यक्तींची नावे तसेच दोन प्रभागात आढळणाऱ्या एकाच मतदारांच्या नावांबाबत पुराव्यासहित हरकती दाखल केल्या होत्या. मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करताना कोणताही फेरबदल करण्यात आला नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
प्रचारादरम्यान काही मतदारांची आधार कार्डे गोळा करून त्यावर आधारित बनावट आधार कार्ड तयार करण्याचा आणि त्याद्वारे बनावट मतदान करण्याचा विरोधकांकडून कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
या पार्श्वभूमीवर, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदान दिवशी, प्रभाग क्रमांक १ मधील दोन्ही मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावर अधिकृत व्हिडिओ शूटिंग कॅमेरे बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती उमेदवारांनी केली आहे. यासोबतच दोन्ही मतदान केंद्रांवर अधिकचा पोलीस बंदोबस्त नियुक्त करावा, अशी मागणी करून त्यासाठी लागणारा खर्च स्वतः उचलण्याची तयारी देखील दाखविली आहे.
या निवेदनाची निवडणूक निर्णय अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे चाळीसगावच्या राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.
