अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला चाळीसगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेना विभाग प्रमुख तसेच रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले किरण साहेबराव आढाव यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा शहराध्यक्ष श्यामला (नाना) कुमावत यांच्या कडे देत हा निर्णय स्पष्ट करत पक्षातील अंतर्गत गोंधळ व कार्यकर्त्यांवरील अन्याय यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
किरण आढाव यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, मागील अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत निष्ठापूर्वक कार्यरत होते. 1990 ते 1995 या काळा पासून शिवसेना व शिवसैनिकांसोबत काम करत असून गेल्या काही काळात पक्षात निर्माण झालेला गोंधळ, आणि स्थानिक पातळीवरील काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे एकनिष्ठ शिवसैनिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधत आढाव म्हणतात की— विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना जोरदार साथ देऊनही त्यांनी शिवसैनिकांना बाजूला काढण्याचे प्रयत्न केले, पक्षाच्या नावाचा व चिन्हाचा वापर करून फक्त स्वतःच्या गटाचे हित साधले आणि निष्ठावंत शिवसैनिकांची उपेक्षा केली.यामुळे प्रामाणिकपणे काम करणे अशक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
शिवसेनेत राहून पक्षाच्या वाढीसाठी कार्य करण्याची इच्छा असूनही आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रेल्वे स्टेशन परिसरासह प्रभाग 1, 2 व 9 मध्ये त्यांनी आढाव यांनी अनेक कामे केली असताना, त्यांच्या प्रयत्नांची योग्य दखल घेतली गेली नसल्याचे ते म्हणतात. “पक्षात गटबाजी, मनमानी निर्णय आणि कार्यकर्त्यांची होत असलेली पिळवणूक पाहून मला मनोमन वेदना होत आहेत. त्यामुळे मी सर्व पदांचा राजीनामा देत असून शिवसेना या पक्षासोबत राहणे आता शक्य नाही,” असे त्यांनी राजीनामा पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
किरण आढाव यांच्या या निर्णयामुळे चाळीसगावातील स्थानिक राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे गटाला या राजीनाम्याचा फटका बसू शकतो.
किरण साहेबराव आढाव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्या सोडत असल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावातील त्यांच्या वॉर्डातील राजकीय समीकरणात नवे बदल घडण्याची शक्यता आहे.
