अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील हिरापूर गावाजवळ नूरानी मशीद परिसरात सोमवारी (दि. 12 जानेवारी) रात्री अंदाजे ९ वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रस्त्यावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला.
मृतांमध्ये सागर संजय वराडे (वय 27),सोमनाथ संजय वराडे (वय 32),अक्षय बापू पाटील (वय 30) सर्व रा. हिरापूर, ता. चाळीसगाव अशी मृतांची ओळख पटली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तिघे जण दुचाकीवरून तळेगाव वरून हिरापूर गावाकडे येत असताना नूरानी मशीदजवळ आयशर कंपनीच्या भरधाव वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर तिघेही तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. काही काळ रस्त्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री महात्मा ज्योतिबा फुले ट्रामा केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय) येथे पाठविण्यात आले होते.
भरधाव वाहन चालक अपघातानंतर फरार झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींच्या आधारे तपास सुरू आहे. या दुर्घटनेने हिरापूर गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
